Description
देशाभिमानशून्यता, समूहरूपाने कार्य करण्याची नालायकी, स्वार्थसाधनाची बेसुमार हाव, आळस, हेळसांड, दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय इत्यादी दुर्गुण आमच्या समाजाच्या अंगी जे खिळले आहेत तेच आमच्या राज्यशासनाला कारण झाले आहेत. असल्या दुर्गुणांनी खिळखिळे झालेले कोणतेही पौरस्त्य राष्ट्र सुधारलेल्या पाश्चात्य राष्ट्राशी विरोध प्राप्त झाला असता टिकाव धरू शकत नाही. हिंदुस्थान जर इंग्रजांनी घेतले नसते तर फ्रेंचांनी घेतले असते. प्रवाहात पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असता त्यातले कोणते फुटायचे, मातीचे कि लोखंडाचे हे ठरलेलेच आहे! हल्लीचा काळ असा आला आहे कि, आम्ही पाश्चात्यांशी बरोबरी तरी करावी, नाही तर त्यांचे मजूर तरी होऊन रहावे ! राजकारण, उद्योगधंदे, कलाकौशल्य, भौतिक शास्रांचा उपयोग, प्रत्येक गोष्टीत हीच स्थिती आहे. जर आम्हास पाश्चात्यांशी बरोबरी करण्याची हिंमत असेल तर या लेखात वर्णिलेले आमचे दुर्गुण आम्ही टाळले पाहिजेत. पूर्वी स्वराज्य होते ते याच दुर्गुणांमुळे गेले, हे समजून जर आम्ही सावध झालो नाही तर, नवीन स्वराज्य मिळूनसुद्धा व्यर्थच आहे, हाच इतिहास डिंडिमाचा घोष प्रत्येकाच्या कानी घुमत राहिला पाहिजे !’
Reviews
There are no reviews yet.